एके दिवशी लहानगा थॉमस शाळेतून येताना सोबत एक कागद घेऊन आला. तो कागद आईला देऊन म्हणाला , "आई हे माझ्या वर्गशिक्षकांनी तुला द्यायला सांगितलय." आईने तो कागद वाचला आणि चटकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. आईला रडताना पाहून छोट्या थॉमसनं आईला का रडतेयस म्हणून विचारलं. आई त्याला जवळ घेत म्हणाली , "काही नाही रे माझ्या बाळा , शाळेचं असं म्हणणं आहे की तुमचा थॉमस खूप खूप हुशार आहे. पण त्याला शिकवण्यासाठी त्याला योग्य अशा गुणवत्तेचा शिक्षकवर्ग आमच्याकडे नाही. म्हणून तुम्ही त्याला घरीच शिकवा.
त्या गोष्टीला बराच काळ लोटला. थॉमस ची प्रेमळ आई त्याला अतिशय प्रेम अन् संस्कार देऊन काळाच्या पडद्याआड गेली. आता थॉमस मोठा शास्त्रज्ञ झाला होता. मानवाला उपयोगी पडतील अशा अनेक शोधांचा तो उद्गाता झाला होता. शतकातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आला होता.
एका निवांत दिवशी तो आपल्या घरी कुटुंबातील जुन्या पुराण्या गोष्टी काढून जुन्या आठवणीत रममाण झाला होता. अचानक कपाटातील ड्रॉवर च्या एका कोप-यात त्याला एक घडी घातलेला कागद दिसला. त्याने तो उघडला. त्यात लिहीलं होतं : तुमचा मुलगा मानसिक दृष्टया आजारी आहे.येथून पुढे तुम्ही त्याला आमच्या शाळेत पाठवू नका. आम्ही त्याला शाळेत घेणार नाही.
ते पत्र वाचल्यावर थॉमस सुन्न झाला. कित्येक तास रडला. मन मोकळं झाल्यावर त्याने आपली रोजनिशी (Diary) काढली. आणि लिहीलं .
"थॉमस अल्वा एडिसन हा लहान पणापासून मानसिकदृष्ट्या अपंग होता. पण त्याच्या जन्मदात्या आईनं त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला शतकातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ करुन दाखवलं ."
....................
परिपूर्ण कुणीच नसतं. पालकानी आपल्या मुलांच्यात उणिवा न शोधता त्यांना सतत प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या आयुष्यात यश संपादित करण्यास सहाय्यक होणं आवश्यक आहे...$.
😊
0 comments:
Post a Comment